Ad will apear here
Next
मनात रेंगाळणाऱ्या कथा
मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चार दीर्घकथा दीप्ती मडी यांनी ‘मंचल’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर आणल्या आहेत.  ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक असलं, तरीही या कथांमधून त्यातील पात्रांच्या विचारांमध्ये असलेला ठामपणा आपल्याला जाणवतो. या कथासंग्रहाचा हा परिचय...
.........
दीप्ती मडी यांचं ‘मंचल’ हे पुस्तक म्हणजे चार दीर्घकथांचा संग्रह आहे. या चारही कथा मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवतात. ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक असलं, तरीही या कथांमधून त्यातील पात्रांच्या विचारांमध्ये असलेला ठामपणा आपल्याला जाणवतो. नायिकाप्रधान म्हणता येतील अशा या कथांमधल्या नायिका प्राप्त परिस्थितीबाबत त्रागा न करता, वास्तवाला सामोऱ्या जाणाऱ्या आहेत. यातील ‘नांदी’ व ‘विराणी’ या कथा फ्लॅशबॅकच्या तंत्राने उलगडत जातात. ‘मैफिल’ व ‘भैरवी’ या कथा वर्तमानातल्या असूनही त्यांना आठवणींची जोड आहेच. 

पंडितजी हे स्वतःच्या कोषात वावरणारे प्रसिद्ध गायक ‘नांदी’ या पहिल्या कथेमध्ये आहेत. त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या दुरावलेल्या मुलाचं आणि पत्नीचं, आपलं असं वेगळं विश्व तयार होतं. या कथेत पंडितजींच्या कोषाबाहेर राहूनही त्यांचं गाणं जपणारी त्यांची पत्नी वसुधा, त्यांचं संगीत अजरामर राहावं यासाठी शेवटपर्यंत कशी धडपडते आणि त्यातून कलेच्या नव्या पर्वाची नांदी कशी होते, याचं चित्रण कथेत केलेलं आहे.

‘विराणी’ ही नाट्यकलावंत असलेल्या जोडप्याची कथा आहे. यातील नायिका चित्रा नायकावर जीव ओतून प्रेम करणारी, त्याला त्याच्या सर्व गुणदोषांसह स्वीकारणारी, समंजस स्त्री आहे. ती हळुवार कविमनाची प्रेमिकाही आहे. कथेतील नायक मनस्वी असला, तरी त्याला या प्रेमाची, तिच्या त्यागाची जाण आहे. त्यामुळेच दुर्दैवी प्रसंग ओढवूनही नायिकेच्या आयुष्याची नवी सुरुवात कशी होईल, यासाठी नायकाने जिवापाड केलेले प्रयत्न यात दिसतात. या कथेत नायिकेनं लिहिलेल्या आणि कथेच्या ओघात आलेल्या कविता खूप छान आहेत. 

एक परिपक्व नातं, तर दुसरं विचारांच्या चलबिचलीत अडकलेलं नातं यांची कथा म्हणजे ‘मैफिल.’ एका मैफलीपासून सुरू झालेलं आई-वडिलांचं मुरलेलं, न सांगताही बरंच काही समजणारं नातं माहीत असलेला मुलगा स्वतः मात्र नातं जोडण्याबाबत साशंक आहे. शेवटी ती विशिष्ट गायकाची मैफल मुलाच्या आयुष्यातही कशी महत्त्वाची ठरते, याची गोष्ट यात आहे.

कर्करोग झालेला मुलगा, त्याची आई, मैत्रीण आणि भाऊ या सगळ्यांच्या भावनांची गुंफण ‘भैरवी’ या कथेत केलेली आहे. कटू वास्तव स्वीकारतानाच एकमेकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करणारे हे सगळेच जण खरे वाटतात. त्यांच्या वागण्यात कुठेही आविर्भाव दिसून येत नाही हे लेखनातलं यश आहे.  

या सर्व कथांमधली पात्रं तसं पाहायला गेलं, तर सामान्य माणसंच आहेत; पण या सामान्यपणातही प्रत्येकानंच एक वेगळेपण जपलेलं दिसून येतं. त्या सगळ्यांमध्ये एक सच्चेपणा आहे. ते या कथांमधून प्रकर्षानं जाणवतं हे लेखिकेच्या कथामांडणीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच या कथा मनात रेंगाळत राहतात. ‘माझं पुस्तक, एखादं सुंदर गाणं आणि तुमची कॉफी हे एक असं विलक्षण जग निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. हे पुस्तक जसं माझ्या मनात रेंगाळलं तसं ते तुमच्याही मनात रेंगाळावं,’ ही लेखिकेची इच्छा हे पुस्तक बऱ्याच अंशी पूर्ण करतं. 

पुस्तक : मंचल – मनाच्या चलबिचलीच्या कथा
प्रकाशक : लिट्रेझर पब्लिशर्स
पृष्ठे : १२४
मूल्य : १५० रुपये

(‘मंचल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZTSBK
Similar Posts
‘कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग’ पुणे : ‘अगदी गर्भात असल्यापासून ते लहानपणी गोष्ट सांगत, ऐकत मोठे होण्यापर्यंत आपण कथेतच रमतो. कथा आपल्याला शिकवतात, प्रेरणा देतात. त्यामुळे कथा हा सामान्य वाचकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो,’
मंचल आजच्या बदलत्या काळाचे प्रतिबिंब नव्या लेखकांच्या लेखनात उमटत आहे. दीप्ती मडी यांच्या ‘मंचल’ मधील कथाही काळसुसंगत आहेत. पंडितजींबरोबर संसार करणारी, पण त्यांच्या गानसाधनेचा भाग नसलेली त्यांची पत्नी वसुधा व मुलगा अनुराग यांचे एक वेगळे जग निर्माण होते. पंडितजींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक पट्टशिष्य जगदीशच्या मदतीने उभारले जाते
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language